24 Jun 2026, Wed

“प्रमोद बळीराम जाधव लिखित ‘आरोग्यदायी नैसर्गिक भातशेती’

प्रमोद बळीराम जाधव लिखित ‘आरोग्यदायी नैसर्गिक भातशेती’ पुस्तकाचे समाजकल्याण आयुक्त मा. सौ. दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते शानदार प्रकाशन..

न्यू विदर्भ केसरी / मुख्य संपादक फुलचंद वाघाडे..

​पुणे :- ‘वनराई’ संस्था आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज पुणे येथील वनराई मुख्यालयातील इको-हॉलमध्ये एका विशेष समारंभात, कृषि, समाजकारण आणि पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मा. श्री. प्रमोद बळीराम जाधव लिखित ‘आरोग्यदायी नैसर्गिक भातशेती’ या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
​या समारंभाचे अध्यक्ष स्थान ‘वनराई’चे मा. श्री. गिरीश गांधी यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याच्या समाजकल्याण विभागाच्या आयुक्त मा. सौ. दीपा मुधोळ-मुंडे उपस्थित होत्या, ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर मा. श्री. विनयकुमार आवटे (कृषि संचालक, कृषि प्रक्रिया व नियोजन/विस्तार, महाराष्ट्र शासन), मा. श्री. संजय पाटील (कृषि-जैवविविधता तज्ज्ञ, बाएफ, नाशिक), आणि श्री. विनायक वैद्य खडीवाले (कार्यकारी विश्वस्त, वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था, पुणे) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. पुस्तकाचे लेखक आणि समाजकल्याण विभागाचे सह आयुक्त श्री. प्रमोद जाधव आणि ‘वनराई’चे सागर धारिया, सचिव श्री. अमित वाडेकर हे देखील यावेळी उपस्थित होते. यासोबत ज्येष्ठ पत्रकार श्री मधू कांबळे, प्रसिद्ध लेखक गौतमीपुत्र कांबळे , बालभारतीचे डॉ. संदीप निकम,पुणे येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, एसएनडीटी , टिळक , तसेच वाघोली येथील आयुर्वेद महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक, देखील उपस्थित होते.
विशेष म्हणजे या कार्यक्रमास सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया व पुणे जिल्ह्यातील भात शेती व इतर शेती करणारे अनेक शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
​विषमुक्त अन्ननिर्मितीचा मार्गदर्शक असणाऱ्या ‘आरोग्यदायी नैसर्गिक भातशेती’ या पुस्तकामध्ये
​प्रमोद जाधव, जे स्वतः नैसर्गिक शेतीचे गाढे अभ्यासक आणि प्रयोगशील शेतकरी आहेत, यांनी आपले संशोधन, पारंपरिक ज्ञान आणि प्रत्यक्ष शेतीतील त्यांचे व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांचे अनुभव या पुस्तकात उतरवले आहेत. हे पुस्तक केवळ भातशेतीबद्दल नसून, ते विषमुक्त अन्ननिर्मिती, आरोग्यदायी जीवनशैली आणि शाश्वत नैसर्गिक शेतीचा मार्ग उलगडणारे एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक आहे.
​लेखकाने या पुस्तकात नैसर्गिक शेतीकडे वळताना घ्यावयाची काळजी आणि त्यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा अत्यंत सोप्या भाषेत मांडली आहे. पुस्तकात अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग आणि पारंपरिक ज्ञान (ITK) यांचा समावेश आहे, जसे की मासोळीपासून खतनिर्मिती, तसेच लाल-तपकिरी तांदळाचे महत्त्व. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा ‘१०१ सेंद्रिय कीड-रोगनाशकां’बद्दलची माहिती हे या पुस्तकाचे प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय, वनस्पतींची प्रतिकारशक्ती वाढवून निरोगी व सक्षम पिके कशी घ्यावीत, आणि शेतीविषयक संकटांवर मात करून भात पीक लोळणे व पूरपरिस्थितीवर शास्त्रीय उपाययोजना कशा कराव्यात, खारेपाटातील शेती यावरही यात सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
​हे पुस्तक शेतकरी, कृषी अभ्यासक आणि नैसर्गिक शेतीची वाट निवडणाऱ्या सर्वांसाठी एक अनमोल ठेवा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
​पुस्तकाच्या प्रकाशनासोबतच, ‘वनराई’ परिसरात शेतकऱ्यांसाठी आणि कृषीप्रेमींसाठी ‘भाताच्या विविध देशी वाणांचे प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला उपस्थित मान्यवरांनी व शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
तसेच कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात विविध जिल्ह्यातील प्रगतशिल शेतकरी हे स्टेजवर प्रमुख अतिथी म्हणून स्थानापन्न झाले. त्यांच्या उपस्थितीत चर्चा सत्र संपन्न झाले.
शेतकरी व त्यांच्या ज्ञानाचा असा यथोचित सन्मान करण्यात आला.
​आजच्या हवामान बदलाच्या आव्हानात्मक काळात, निसर्गस्नेही आणि आरोग्यदायी शेतीच्या या नव्या प्रवासात ‘आरोग्यदायी नैसर्गिक भातशेती’ पुस्तक हे एक मैलाचा दगड ठरेल, असा सूर या कार्यक्रमात उमटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!