24 Jun 2026, Wed

अंकुश (गोलू ) नैताम २६४ मतांनी विजयी, मतदारांनी परिवर्तन नाकारले ; “विजयाचे किंगमेकर” युवा नेते नगरसेवक सागर निंबोरकर..

भाजपची रणनीती यशस्वी : प्रभाग क्रमांक ९ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून कायम..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे.. 

गडचिरोली :- गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक तथा आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला बालेकिल्ला कायम राखला आहे. आज पार पडलेल्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार अंकुश नैताम यांनी काँग्रेसचे उमेदवार विनोद भांडेकर यांचा २६४ मतांनी पराभव करून विजय संपादन केला. मतमोजणीअंती जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपचे उमेदवार अंकुश नैताम यांना १,३७१ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार विनोद भांडेकर यांना १,१०७ मते प्राप्त झाली. अपक्ष उमेदवार सुनील बावणे यांना ९८ मते मिळाली. याशिवाय NOTA (नोटा) पर्यायाला ४४ मतदारांनी पसंती दिली. अखेर अंकुश नैताम यांनी २६४ मतांची आघाडी घेत विजयी मजल मारली. विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक ९ हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपला सुमारे २०० मते कमी मिळाली असली, तरीही पक्षाने आपली जागा कायम राखत विजय मिळवला. त्यामुळे मतसंख्येत घट झाली असली तरी प्रभागातील भाजपची संघटनात्मक ताकद अद्यापही कायम असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रशासनाकडून अंकुश नैताम यांना अधिकृत विजय प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगर परिषद परिसरातून भव्य विजय रॅली काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषपूर्ण घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. शहरातील विविध मार्गांवरून निघालेली ही रॅली अखेर प्रभाग क्रमांक ९ मध्ये जाऊन संपन्न झाली.

या विजय रॅलीमध्ये लावण्यात आलेले काही बॅनर विशेष चर्चेचा विषय ठरले. बॅनरवर भाजपचे युवा नेते नगरसेवक सागर निंबोरकर आणि गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांचे मोठे छायाचित्र झळकत होते. अनेक कार्यकर्त्यांनी या निवडणुकीतील विजयामागे सागर निंबोरकर आणि नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगत त्यांना “गेम चेंजर” आणि “किंग मेकर” अशी विशेषणे देखील दिली. त्यामुळे विजय रॅलीत या दोन्ही नेत्यांची उपस्थिती आणि त्यांच्यावरील बॅनर राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरले.

दिवंगत नगरसेवक मुक्तेश्वर काटवे हे नगर परिषदेतील आरोग्य सभापती पदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या निधनानंतर हे पद अद्याप रिक्त ठेवण्यात आले आहे. आता भाजपचे नवोदित नगरसेवक म्हणून अंकुश नैताम निवडून आल्यानंतर त्यांना आरोग्य सभापतीपदाची जबाबदारी दिली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगर परिषदेतील आगामी राजकीय घडामोडींमध्ये हा विषय महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पूर्ण ताकद लावली होती. नगराध्यक्षा ॲड. प्रणिता निंबोरकर, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबवली. घराघरात जाऊन प्रचार करण्यात आला. त्याचबरोबर दिवंगत नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांनी केलेल्या विकासकामांचाही प्रचारात प्रभावीपणे उल्लेख करण्यात आला. राजकीयदृष्ट्या पाहता, हा विजय भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. एकीकडे पक्षाने आपली पारंपरिक जागा कायम राखली असली तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत मतांमध्ये झालेली घट भविष्यात पक्षासाठी चिंतनाचा विषय ठरू शकते. दुसरीकडे काँग्रेसने चांगली लढत दिली असली तरी विजयापासून त्यांना दूर राहावे लागले. विजयानंतर बोलताना नवनिर्वाचित नगरसेवक अंकुश नैताम यांनी प्रभागातील सर्व मतदारांचे आभार मानले. “ज्यांनी मला मतदान केले आणि ज्यांनी मतदान केले नाही, त्या सर्व नागरिकांचा मी ऋणी आहे. प्रभागातील प्रत्येक नागरिकासाठी समान भावनेने काम करणार असून विकासाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करेन,” असे त्यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक ९ च्या या पोटनिवडणुकीच्या निकालामुळे गडचिरोलीच्या स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा भाजपचे वर्चस्व अधोरेखित झाले असून आगामी नगर परिषद राजकारणासाठी या निकालाकडे महत्त्वाच्या राजकीय संकेतांच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!