13 Sep 2026, Sun

एटापल्ली पंचायत समिती कार्यालयात नाग सापाचे धाडसी रेस्क्यू..

समर्पण ट्रस्टच्या प्रशिक्षणातून घडले धाडसी सर्पमित्र..

न्यू विदर्भ केसरी / तालुका प्रतिनिधी एटापल्ली..

एटापल्ली :- समर्पण ट्रस्ट एटापल्ली यांच्या माध्यमातून प्रशिक्षित सर्पमित्रांनी पंचायत समिती कार्यालय परिसरात आढळलेल्या नाग सापाचे यशस्वी रेस्क्यू करून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.

एटापल्ली पंचायत समिती कार्यालय परिसरात नाग साप आढळल्याने कर्मचारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत संकेत फुलमाळी यांनी माहिती दिल्यानंतर सर्पमित्र शशांक नामेवार, तेजस गुज्जलवार व अनिकेत मामीडवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अत्यंत सावधगिरीने नाग सापाला पकडले. त्यानंतर सापाला कोणतीही इजा न करता कृष्णार रोड परिसरातील जंगलात सुरक्षित सोडण्यात आले.

या रेस्क्यू मोहिमेदरम्यान समर्पण ट्रस्टचे अध्यक्ष राघवेंद्र सुलवावार तसेच सदस्य संपत पैडाकुलवार उपस्थित होते. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

विशेष म्हणजे, मागील वर्षी समर्पण ट्रस्ट एटापल्लीतर्फे प्रशिक्षक श्रीकांत नैताम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या सर्पमित्र प्रशिक्षण शिबिराचे हे उल्लेखनीय फलित मानले जात आहे. या प्रशिक्षणातून तयार झालेले युवक आज निःशुल्क पद्धतीने नागरिकांच्या मदतीला धावून जात वन्यजीव संवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत.

यावेळी समर्पण ट्रस्टचे अध्यक्ष राघवेंद्र सुलवावार यांनी सांगितले की, “सर्पमित्रांचे कार्य हे केवळ साप पकडण्यापुरते मर्यादित नसून नागरिकांचे प्राण वाचविण्यासोबतच वन्यजीवांचे संरक्षण करण्याचे मोठे सामाजिक कार्य आहे. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या या युवकांचा आम्हाला अभिमान आहे.”

समर्पण ट्रस्ट एटापल्लीचे पदाधिकारी म्हणून राघवेंद्र सुलवावार (अध्यक्ष), राहुल कुळमेथे (उपाध्यक्ष), अमोल गजाडीवार (सचिव), रोहित बोमकंटीवार (सहसचिव), सूरज मंडल (कोषाध्यक्ष), संपत पैडाकुलवार, अंकित दीकोंडावार व संतोष गंदेशिरवार (सदस्य) यांनी वेळोवेळी सहकार्य करून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. समर्पण ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक, पर्यावरणीय व जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून नागरिकांकडून या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!